गुलाबप्रेमी जयंतराव टिळक   

भगवंत ठिपसे : माजी अध्यक्ष- दि रोझ सोसायटी ऑफ पुणे, 

विद्यमान कार्याध्यक्ष वेदशास्त्रोत्तेजक सभा

माजी मंत्री, विधान परिषदेचे माजी सभापती, ‘केसरी’चे माजी विश्वस्त-संपादक कै. जयंतराव टिळक यांचा आज (बुधवारी) स्मृतिदिन. त्या निमित्त... 
गुलाबाच्या आवडीमुळे १९६२ मध्ये आदरणीय जयंतराव टिळक तथा दादांनी पुणे रोझ सोसायटीची स्थापना केली. पहिले गुलाबाचे प्रदर्शन टिळकवाड्यात गणेशात्सवाचा एक कार्यक्रम म्हणून ठरवला. त्यानंतर दरवर्षी गुलाब प्रदर्शन टिळक वाड्यात भरू लागले. मी सुमारे १९६७ पासून प्रदर्शनाचे काम पाहू लागलो. १९७१ मध्ये पुणे रोझ सोसायटीचा सभासद झालो. गुलाब प्रदर्शनाला दादा संपूर्ण दिवसभर उपस्थित असत. आम्हा मुलांना उत्सुकता असायची. त्यावेळी मोठ मोठ्या व्यक्तींना पाहण्यात, त्यांची भाषणे ऐकण्यात. नंतर दादा विधान परिषदेवर गेले व त्यांनी रोझ सोसायटीचे अध्यक्षपद आर. के. देशपांडे तथा काका देशपांडे यांच्याकडे सोपवले. त्यानंतर प्रतिवर्षी गुलाब प्रदर्शन भरवले जात असे; त्यात दादांचा सहभाग असायचाच!
 
या प्रदर्शनात व गुलाब जोपासण्यात कै. सौ. इंदूताईंचाही सहभाग असायचाच. फुले झाडावर आली की इंदूताईंचा आनंद ओसंडून वाहायचा. त्यांची एक गंमत मला पुढे कित्येक वर्षांनी कळाली. आर. के. देशपांडे या नावाची टेलिफोन डिरेक्टरीमध्ये दोन नावे होती; पण बर्‍याचदा आर. के. देशपांडे ऊर्फ काका देशपांडे यांना फोन न लागता चुकून दुसर्‍याच देशपांडे यांना लागायचा. हे आर. के. देशपांडे चार्टर्ड अकाउंटंट होते. इंदूताई गुलाबाचे वर्णन आणि माहिती या देशपांडे यांच्याशी शेअर करत.
 
ते देशपांडे सर्व ऐकून घेत व नंतर हळूच सांगत की, तो देशपांडे मी नव्हे. माझ्या या देशपांडेंचाही काही वर्षांनंतर परिचय झाला. त्यांनी बंगला बांधून त्याच्या भोवती उत्तम गुलाब बगीचा तयार केला होता. त्यांची गुलाब बाग पाहिल्यानंतर त्यांनीच हा किस्सा सांगितला व इंदूताईंच्यामुळेच ही गुलाबबाग केल्याचे आवर्जून सांगितले.
 
पुण्यात टिळक स्मारक मंदिराची भव्य वास्तू उभारली गेली व नंतर हिवाळी व पावसाळी अशी दोन प्रदर्शने येथेच भरण्यास सुरुवात झाली.१९८४ मध्ये भारतातील सर्व गुलाब प्रेमींचे ४ थे संमेलन टिळक स्मारक मंदिरात भरवण्यात आले. त्यात दादांचा मोठा सहभाग होता. आम्ही कार्यकर्ते यांची टीम उभी करण्यात दादांचाच वाटा आहे. १९९०, २०२२ पर्यंत ५ अखिल भारतीय संमेलने भरवण्यात आली.
 
१९८५ मध्ये पुणे रोझ सोसायटचे नाव बदलून दि रोझ सोसायटी ऑफ पुणे असे नामकरण करून संस्था रजिस्टर्ड करण्यात आली. सुरुवातीला प्रदर्शनात जेमतेम खर्च भागत होता. कमी पडले तर कै. दादा स्वतःचे पैसे देत. त्यांची धारणा होती की पैसे जादा जमले की दृष्प्रवृत्तीचे लोक जमा होतील. यामुळे सुरुवातीला त्यांची मदत घेत होतो; पण जसा खर्च वाढू लागला तसे पैसे जमा करणे क्रमप्राप्त होते; पण त्यांचा आमच्यावर विश्वास होता. आम्ही आजतागायत पैसे जमा केले तरी त्याचा हिशेब सर्व व्यवस्थित ठेवत आलो. आज भारतातील ही एकमेव रोझ सोसायटी आहे की उत्तम कार्यकर्ते व सर्व संस्थात स्वयंपूर्ण खर्च भागवू शकते. ही गंगाजळी संस्थेने विविध उपक्रमातून आणि देणग्यातून उभी केली आहे. याचे श्रेय निश्चितच दादांना आहे. सुरुवातीस जो उत्तम कार्य करत आहे त्यास अध्यक्ष करत असत; पण नंतर अध्यक्षपदासाठी उत्सुक उमेदवार वाढत गेले तसे निवडणूक प्रक्रियेतून अध्यक्ष निवडण्याची प्रथा सुरू झाली. दादांचे मार्गदर्शन वेळोवेळी होत असे. 
 
प्रदर्शन खूप लोकप्रिय होत होते व इतर गावातून सातारा, सांगवी, इचलकरंजी, नाशिक, फलटण, मुंबई येथील गुलाबप्रेमी प्रदर्शनात भाग घेत असत व स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसेही पटकावीत असत.मी १९९९ ते २००१ या काळात अध्यक्ष झालो. त्यावेळी सकाळी ७/७.१५ च्या दरम्यान त्यांना भेटण्यासाठी टिळकवाड्यात त्यांच्या घरी जात असे. त्यावेळेत त्यांचे केसरीच्या अंकाचे वाचन   चाललेले असे. त्यांना संस्थेतील कामाची माहिती देत असे. सहकार नगरमध्ये एक मोकळ्या जागेत गुलाब उद्यान करणार आहोत. त्याबद्दल त्यांना सांगितले; बरेच प्रयत्न करूनही गुलाबाची बाग होण्याचे साधत नव्हते. मला त्यांनी आव्हान दिले की तुम्ही महानगरपालिकेला व दि रोझ सोसायटीच्या विद्यमाने गुलाब उद्यान करून दाखवावे.
 
उद्यान मुख्य अधीक्षक यशवंत खैरे यांना गुलाबाची आवड होती. त्यानी फंडस् नसतानाही मनावर घेऊन सन २००० मध्ये आम्ही गुलाबबाग तयार केली त्यात सर्व गुलाब प्रेमींनी झाडे भेट म्हणून दिली व उत्तम बाग तयार झाली.एक दिवस कै. दादांना भेटलो व बाग तयार झाली आहे, आपण पाहावयास यावे असे सांगितले. ते त्यांनी मान्य केले व गुलाब बाग बघण्यास आले. त्यांचा अभ्यासही होताच. विविध प्रकारचे गुलाब नावा सहित लावलेले व सुंदर फुले पाहून अत्यंत प्रसन्न झाले.
 
विधान परिषदेचे सभापती असताना ही गुलाबासंबंधीचा कार्यक्रम कधीही त्यांनी चुकवला नाही. ते आणि इंदूताई आवर्जून प्रत्येक कार्यक्रमात येत असत. एके वर्षी आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष कै. एन. ए. जोशी तथा नाना जोशी यांची पंच्याहत्तरी साजरी करण्याचे त्याचे तळेगाव येथील बागेत करण्याचे ठरले. त्याच दिवशी विधान परिषदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता; पण ते या कार्यक्रमाला आले. सर्वांबरोबर भोजन घेतले व नंतर मुंबईला रवाना झाले.
 
टिळक स्मारक मंदिराचे व्यवस्थापक व त्यांचे बालमित्र कै. विष्णूपंत मेहेंदळे तथा काका मेहेंदळे यांच्या दोघांची थट्टा मस्करी चालायच्या. अरे तुरे म्हणत खेळीमेळीच्या वातावरणात ते रममाण होत असत.संस्थेचे एक संस्थापक डॉ. सोमण होते. त्यांचा अभ्यास गुलाबात दांडगा होता. ते पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुख होते. त्यांच्याकडे ‘पीस’ नावाचा गुलाब होता. तो सुंदर फुलला आहे, असे कळले. त्यावेळी दादा तरुण होते, लगेच डॉ. सोमणांच्या घरी गेले; पण त्यांच्या आईने सांगितले, डॉ. सोमण घरी नाहीत, ते आल्यावर या त्यांच्या आईला माहीत नव्हते.. हे लोकमान्यांचे नातू जयंत टिळक आहेत. डॉ. सोमण घरी आल्यावर त्यांच्या आईने सांगितले, जयंत म्हणून कोणीतरी तुला भेटायला गुलाबाची बाग पाहायला आले होते; पण त्यांचा आवाज लोकमान्यांच्या आवाजासारखा होता. तेव्हा डॉ. सोमणांनी आईला सांगितले अग ते लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक होते; पण सोमणांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना तो गुलाब दाखवण्यासाठी घेऊन आले. त्यांनी ते मनावरही घेतले नाही. साधेपणा हा त्यांचा स्वभाव होता.
 
एके दिवशी आम्ही टिळक स्मारक मंदिरात बसलो होतो. मी काका मेहेंदळे व इतरजण होते. अचानक दादा टिळक स्मारक मंदिरात चालत येताना दिसले. आमच्या जवळ आले. विष्णूपंतांना म्हणाले मी चालत टिळकवाड्यातून निघालो. मला भरत नाट्य मंदिराला काही देणगी द्यावयाची होती ती दिली, आणि चालत येथे आलो. विष्णू चहा आण असे म्हणत गप्पा मारत त्यांच्या बरोबर चहा घेतला व नंतर परत ते टिळकवाड्याकडे निघाले.असे किती तरी प्रसंग आमच्याशी ते हितगूज करते. आम्हाला त्यांचा भीतीयुक्त आदर वाटत असे; पण केव्हा फोन करून त्यांना लागणारी झाडे आणण्यासाठी हक्काने सांगता जशी आपल्या घरातील वडील माणसे सांगतात.
 
आज त्यांना या विश्वातून देहरूपाने जाऊन २४ वर्षे झाली; पण आजही त्यांच्या सहवासाची आठवण ताजी आहे, आणि ते आपल्यात आहेत, असेच जाणवते.
 
पुणे महानगर पालिका आणि दि रोझ सोसायटी ऑफ पुणे यांचे विद्यमाने एकत्रपणे केलेले हे उद्यान आजही दिमाखदारपणे आहे. आदरणीय दादांचे अकस्मात निधनानंतर पुणे महानगरपालिका व दि रोझ सोसायटीतर्फे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जयंतराव टिळक गुलाब उद्यान हे नाव या उद्यानास देण्यात आले.
 

Related Articles